Home राज्य वह्या, पेन्सिल, बॅग,स्टेशनरी साहित्य यांसह अनेक वस्तूच्या किंमतीत वाढ

वह्या, पेन्सिल, बॅग,स्टेशनरी साहित्य यांसह अनेक वस्तूच्या किंमतीत वाढ

0
171

DDK न्यूज :- वह्या, पेन्सिल, बॅग आदी शालेय साहित्याच्या किंमतीत प्रचंड वाढ, पालकांमध्ये संताप
शाळा सुरू होण्यासाठी आता अवघे काहीच दिवस शिल्लक असताना पालकांची मुलांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होताना दिसत आहे .नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाजारपेठ गजबजलेली दिसत असली, तरी शालेय साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे पालकांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे दिसून येत आहे.
कागद, प्लास्टिक आणि इतर कच्च्या मालाच्या किंमतीत तसेच वाहतूक खर्चातही मोठी वाढ झाल्याने शालेय साहित्याच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झाली आहे. परिणामी या वाढीचा थेट परिणाम ग्राहकांवर होत असल्याचे चित्र दिसत आहे.मागील वर्षी सहा वह्यांचा संच सुमारे 290 रुपयांना उपलब्ध होता. मात्र यंदा त्याच संचासाठी पालकांना तब्बल 350 रुपये मोजावे लागत आहेत. पेन, पेन्सिल, रंगसाहित्य आणि इतर शालेय वस्तूंच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून येत आहे.                                                                                             दरवाढीमुळे घराचे बजेट पूर्णपणे कोलमडल्याची भावना अनेक पालकांनी व्यक्त केली. सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. घरखर्च सांभाळत बचत करून खर्च करावा लागत आहे. मात्र मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे साहित्य आवश्यक असल्याने ते घेणे भाग पडते. मागील वर्षी अतिरिक्त वह्या घेतल्या होत्या, परंतु यंदा वाढलेल्या किमतींमुळे केवळ गरजेपुरत्याच वस्तू खरेदी करत आहोत, अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली.                                                                                          काही खाजगी शाळांकडून विशिष्ट वह्या आणि पुस्तके घेण्याचा आग्रह धरला जातो. त्याच प्रमाणे शाळेचा गणवेश, बॅग, बूट अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा आग्रह केला जातो त्यामुळे एक प्रकारची पालकांची पिळवणुक केली जाते. त्यामुळे सामान्य कुटुंबांना आर्थिक ताण सहन करावा लागतो. तरीही मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक असल्याने हे साहित्य घ्यावेच लागते, असे पालकांनी सांगितले.                  दुसरीकडे, व्यापाऱ्यांनीही भविष्यात आणखी दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि वाहतूक खर्चाचा परिणाम शालेय बॅगसह इतर साहित्यावरही होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी आणि पालक सज्ज होत असताना वाढत्या महागाईमुळे शालेय साहित्य खरेदीचा खर्चही वाढला आहे. शिक्षण हा मुलांचा मूलभूत हक्क असला, तरी या वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य पालकांच्या आर्थिक नियोजनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
वाढत्या महागाईचा विचार करत शासनाने शालेय साहित्य कमी किमतीने उपलब्ध करून द्यावे आणि जास्त दराने साहित्य वाटप करणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जारी करावेत. अशी मागणी सर्व स्तरांतील पालकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here