Home प्रशासकीय सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

0
38

समाजकंटक व गुंडप्रवृत्ती असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे – अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील

सोलापूर प्रतिनिधी :- सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दि. 5 ऑगस्ट 2026 रात्री 20 वा. पासून ते 19 ऑगस्ट 2026 रात्री 20 वा. पर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) अ ते फ व 37 (3) अन्वये पाचहून जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार समाजकंटक व गुंडप्रवृत्ती असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे होईल. तसेच शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे/वापरणे, व्यक्ती अथवा त्यांची प्रेतयात्रा/प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, तसेच सभ्यता किंवा निती विरुद्ध निरनिराळ्या जाती-जमातीच्या भावना दुखावल्या जातील अशा कृतींमुळे भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होऊ नये यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. सोंगे किंवा चिन्हे तयार करून त्याचा प्रसार करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश अत्यावश्यक सेवा तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजावताना वरनिर्दिष्ट वस्तू/विषय हाताळावे लागतात अशा प्रकरणांमध्ये लागू होणार नाही. ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस हा आदेश लागू होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here